काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींवर निशाणा साधला. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मौनव्रत’ सोडून ‘मन की बात’ करावी. या सर्व प्रकरणाची माहिती नरेंद्र मोदी यांना होती. त्यामुळेच ते शांत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.
काँग्रेसने मोदी यांना पाच प्रश्न विचारले आहेत. या पाचही प्रश्नांमध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. ललित मोदी यांना मदत करणाऱ्या स्वराज व राजे या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम १३ (१) नुसार दोषी ठरत नाहीत का? कारण त्यांनी कोणत्या आधारावर ललित मोदींची मदत केली. हवाला व फेमा कायद्यांतर्गत स्वराज व राजे दोषी आहेत. ललित मोदी यांना पासपोर्ट व व्हिसा मिळवून देताना त्यांनी नियमांचे उल्लंघन केलेले नाही का? मॉरिशसमधील कंपनीकडून २१ कोटी रुपयांची गुंतवणूक व वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत यांच्या कंपनीत ६३ कोटी रुपयांची गुंतवणूक एकच व्यवहार आहे का? या प्रकरणाची चौकशी प्रवर्तन निदेशालय करीत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कशाच्या आधारावर ललित मोदी व दुष्यंत सिंह यांना निदरेष ठरविले? जेटली यांच्या ‘क्लीन चिट’मुळे या प्रवर्तन निदेशालयाच्या तपासावर प्रभाव पडणार नाही का, असा प्रश्न रमेश यांनी उपस्थित केला.
वसुंधरा राजे यांच्या पाठीशी भाजप -गडकरी
जयपूर: आयपीएल सट्टाबाजी घोटाळ्यात अडकलेले आरोपी ललित मोदी यांच्याशी संबंध असल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भाजपने सोमवारी दिलासा दिला. भाजप तसेच केंद्र सरकार राजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्याविरुद्धच्या आरोपांमध्ये ‘काही तथ्य’ नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजे यांना भेटल्यानंतर सांगितले.वसुंधरा राजे यांनी काहीही चुकीचे केलेले नसून, अशा मुद्दय़ांवर राजकारण केले जाऊ नये. राजे कायदेशीरदृष्टय़ा, तार्किकदृष्टय़ा आणि नैतिकदृष्टय़ा  पूर्णपणे बरोबर आहेत असा दावा गडकरींनी केला.