पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला.
मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवाकरातंर्गत (जीएसटी) आणत नाही, तोपर्यंत काँग्रेससह विरोधी पक्षांचे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने आज दिला. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी मोदी सरकार व भाजपावर हल्लाबोल केला.
तर सरकार विरोधकांची एकजुट पाहून घाबरले आहे. आम्ही इंधनाचे दर नियंत्रणात आणू शकत नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. त्यांचे अपयश त्यांच्या याच भूमिकेत दिसून येते असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या पक्षांचा पाठिंबा
‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.
पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरूच राहणार अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली. ५२ महिने आता संपले आहेत या सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
भाजपाने विरोधात असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात केलेली आंदोलने तुम्हाला आठवत आहेत का? त्यावेळी त्यांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आता इंधन दर वाढत आहेत, रूपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला आहे. यामुळे देश संकटात आहे असेही फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. जनक्षोभ उसळेल इतके इंधन दर नकोत असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये भारतबंद आंदोलनादरम्यान एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. भारत बंद असल्याने उपचारांसाठी तिला वेळेवर रूग्णालयात पोहचण्यास उशीर झाला असे तिच्या पालकांनी म्हटले आहे.
पुणे पोलिसांनी इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या ६ मनसैनिकांना अटक केली आहे. हे सगळे जण दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न करत होते असे पोलिसांनी म्हटले आहे.
चंद्रबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशमधील पेट्रोल डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली. आज मध्यरात्री पासून लागू होणार नवीन दर
राजस्थानमध्ये निवडणुका आहेत म्हणून तेथील सरकारने इंधानावरील कर कमी केला. महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून राज्याचे मुख्यमंत्री बसून आहेत: संजय निरुपम
सिद्धीविनायक मंदिराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे दाखवले, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला
इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाही तर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत अशी प्रतिक्रिया रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत असे सांगितले. तसेच ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. आज जो बंद पुकारला जातो आहे त्यात देशाचे नुकसान होतो आहे. बिहार या ठिकाणी अँब्युलन्समध्ये एक मुलगा अडकल्याने मरण पावला. बसेस जाळल्या जात आहेत. पेट्रोल पंपांची तोडफोड केली जाते आहे या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सिद्धिविनायक मंदिरात पोस्टल स्टॅम्पच्या प्रकाशनासाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांविरोधात मंदिराबाहेर मनसैनिकांनी घोषणाबाजी केली.
छायाचित्र - निर्मल हरिंद्रन
बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी लालबाग येथून ताब्यात घेतलं आहे
मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान हिंसा करत भाजपा नगरसेवकाचं कार्यालय फोडलं आहे
नरेंद्र मोदी जिथे जात तिथे आश्वासन देत होते. नरेंद्र मोदी तो़डण्याचं काम करत असतात. विरोधात असताना नरेंद्र मोदी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यावरुन टीका करत होते. मात्र आता एक शब्द बोलत नाहीत. मोदी फक्त भाषण देसत असतात, काम करत नाहीत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
मनसेने जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला आहे. पोलिसांनी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला असता महिला कार्यकर्त्या ठाण मांडून बसल्या. महिला पोलीस नसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. साधारण पंधरा मिनिटं हे आंदोलन झालं, यात वाहनांच्या रांगा लागल्या.
चेंबूर प्रतिक्षानगर आणि वाशी डेपोमध्ये बसवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत
मोदी सरकराने देशाच हित नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. सरकार बदलण्याची वेळ आली आहे
डीएननगरला मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखून धरली आहे
दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली असून ५० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे
काँग्रेस कार्यकर्ते अंधेरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उतरुन घोषणाबाजी करत आहेत
चेंबूरमध्ये भारत बंदला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळत असून येथे ४० ते ४५ गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजघाट येथे दाखल झाले असून, तेथूनच काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनाला सुरुवात होणार आहे