काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व दहशतवादी संघटना मुस्लीम ब्रदरहूड यांच्यात काय साम्य आहे याचा तुलनात्मक आढावा दिला आहे. या दोन्ही संघटना एकाच वर्षी स्थापन झाल्या इथपासून ते विचारधारा अशी तुलना करण्यात आली आहे.युरोपच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेस या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड वादावादी झाली होती. दोन्ही संघटनांमधील वाद शमण्याची चिन्हे नसून आता काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुखानं यात उडी घेतली आहे.

भारताची सेक्युलर संस्कृती उखडण्याचा आरएसएसचा प्रयत्न असून मुस्लीम ब्रदरहूडनंदेखील तसाच प्रयत्न केल्याचं स्पंदना यांनी म्हटलं आहे. दोन्ही संघटनांना सामाजिक चळवळींचं सहाय्य कसं मिळालं व त्या माध्यमातून ते सत्तेपर्यंत कसे पोचले याचा दाखलाही स्पंदनांनी दिला आहे.

अरब स्प्रिंगमुळे इजिप्तमध्ये मोहम्मद मोरसींना सत्ता मिळाली तर अण्णा हजारेंच्या चळवळींनी आरएसएसला बळ दिलं व मोदींना सत्तेपर्यंत नेलं अशी मांडणी त्यांनी केली आहे. मुस्लीम ब्रदरहूड व आरएसएस दोघांनाही सत्ता मिळवण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुस्लीम ब्रदरहूडची स्थापना हसन अल बना या शिक्षक असलेल्या मुस्लीम अभ्यासकानं 1928 मध्ये केली होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवारांनी केली. भारताचं उत्थान व जागतिक शांतता अशी संघाची उद्दिष्ट्ये आहेत.