आगामी लोकसभा निवडणुकीची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून प्रमुख तीन समितींच्या सदस्यांची घोषणा शनिवारी करण्यात आली. निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी असलेली नऊ सदस्यांची मुख्य समिती, जाहीरनामा तयार करण्यासाठी १९ सदस्यीय समिती आणि १३ जणांची प्रसिद्धी समिती अशा तीन समितींमध्ये मिळून एकूण ४१ सदस्यांवर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील मुख्य समितीत जुन्याजाणत्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ए. के. अ‍ॅण्टोनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदम्बरम, अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, जयराम रमेश, रणजीत सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल हे सदस्य पक्षाची निवडणूक रणनीतीपासून उमेदवारांची अंतिम निवडीपर्यंत सर्व बाबी ठरवतील. मुख्य समितीत असलेले पी. चिदम्बरम, जयराम रमेश हे दोघे जाहीरनामाविषयक समितीचेही सदस्य आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले सुरजेवाला हे प्रसिद्धी समितीचेही सदस्य आहेत.

राज्यातील चौघांचा समावेश

जाहीरनामा आणि प्रसिद्धी समितीत महाराष्ट्रातील काँग्रेस सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. जाहीरनामाविषयक समितीत भालचंद्र मुणगेकर, रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धी समितीत मिलिंद देवरा, कुमार केतकर यांना घेण्यात आले आहे. जाहीरनामा समितीतील महत्त्वाचे सदस्य: सुश्मिता देव, सलमान खुर्शीद, कुमारी सेलजा, मीनाक्षी नटराजन, सॅम पित्रोडा, शशी थरूर, मुकुल संगमा.

प्रसिद्धी समितीतील महत्त्वाचे सदस्य

पवन खेरा, आनंद शर्मा, राजीव शुक्ला, स्पंदना दिव्या, मनीष तिवारी, प्रमोद तिवारी.