सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची काँग्रेसची मागणी ही राजकीय चाल असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. वादग्रस्त विषयांवर सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. न्यायाधीश लोया प्रकरणात सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये खोटेपणाचा प्रचार करायचं विरोधी पक्षांचं षडयंत्र सुप्रीम कोर्टानं उघड केल्याचे जेटली म्हणाले.

न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तसेच त्यांच्या मृत्यूप्रकरणी कुठलीही चौकशी करण्याची गरज नाही असा निर्वाळाही सुप्रीम कोर्टाने दिला. त्यावर काँग्रेसने प्रचंड टीका केली होती. या याचिकांच्या मागे राहूल गांधींचा अदृष्य हात असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता.

सत्ताधारी पक्षाला राहूल गांधींबद्दल असलेली भीती पात्रांच्या उद्गारातून दिसते असा प्रतिटोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी लगावला. भाजपा घायकुतीला आला असून त्यांचं भय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यावरून उघड होतं असंही सुर्जेवाला म्हणाले आहेत.

जनहित याचिकेचं स्वरूप सध्या संस्थांच्या कामांमध्ये अडथळे आणायचे या स्वरुपाचं बनत असल्याचा आरोपही जेटलींनी केला आहे. चुकीचे पर्याय निवडायचे, सच्चाईचा आव आणत खोटेपमा करायचा, विरोधकांवर विनाकारण टीका करायची आणि न्यायाधीशांशी असभ्यपणे वागायचं अशी काँग्रेसची वर्तणूक झाल्याची टीका जेटलींनी केली आहे.