जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, स्पेनसारख्या देशांमध्ये दिवसाला शेकडो जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. अस अतानाच दुसरीकडे ज्या चीनमधून या विषाणूचा जगभरामध्ये फैलाव झाला तेथे मात्र मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता चीनमधून इतर देशांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क, करोनाचा चाचणीसाठी लागणारे पीईई कीट्स आणि इतर वैद्यकीय सामानाचा समावेश आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

चीनमधील वुहान शहरामध्ये करोनाने थैमान घातलं होतं त्यावेळी इटलीने चीनला मदत म्हणून काही वैद्यकीय साहित्य पाठवलं होतं. यामध्ये प्रामुख्याने पीपीई कीट्स म्हणजेच करोनाचा चाचणीच्या कीट्सचा समावेश होता. मात्र त्यानंतर हळूहळू चीनमधील प्रादुर्भाव कमी झाला आणि इटलीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला. इटलीमध्ये करोनामुळे दहा हजारहून अधिक जणाचा मृत्यू झाला असून देशभरात करोनामुळे भीतीचे वातावरण आहे. आता चीनने इटलीला पीपीई कीट्स मदत म्हणून पाठवण्याची घोषणा केली आहे. मात्र ‘द स्पेक्टेटर’ या ब्रिटीश मासिकाने चीन पीपीई कीट्स इटलीला मदत म्हणून मोफत देण्याऐवजी विकत असल्याचा दावा केला आहे. जे कीट्स इटलीने चीनला मदत म्हणून पाठवले होते तेच कीट्स आता चीनकडून इटलीला विकत असल्याचे मासिकामधील एका वृत्तामध्ये म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द स्पेक्टेटर’ला दिलेल्या माहितीनुसार, “करोनाचा युरोपमध्ये प्रादुर्भाव वाढण्यासाठी इटलीने चीनला मदत म्हणून लाखो पीपीई कीट्स पाठवले होते.” चीनमधील जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता यावे यासाठी इटलीने मदत केली होती. “आता इटलीमध्ये करोनाचा फैलाव झालेले असताना चीन इटलीली त्यापैकीच काही पीईई कीट परत पाठवत आहे. त्यातही यासाठी ते इटलीकडून पैसे घेत आहेत,” असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

नक्की वाचा >> चीनकडून सदोष मास्क आणि टेस्ट कीटची निर्यात; स्पेनपाठोपाठ नेदरलँड रद्द केला सौदा

चीनने याआधीही अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे वृत्त समोर आलं आहे. इटलीप्रमाणेच करोनाचा मोठा फटका बसलेल्या स्पेननेही चीनमधून मागवलेले ५० हजार चाचणीचे कीट्स परत पाठवले आहेत. हे चाचमीचे कीट्स सदोष असून यामाध्यमातून केलेल्या चाचण्या योग्य असण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के असल्याचा आरोप स्पेनने केला आहे. चेक प्रजासत्ताकनेही चीनकडून येणाऱ्या सदोष चाचणी कीट्सची आयात थांबवली आहे. इतकच नाही तर पाकिस्तानलाही चीनने फसवल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनने करोनाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला एक ९५ मास्क देण्याची कबुली दिली होती. मात्र चीनने अंतर्वस्त्रांच्या कापडापासून बनवलेले मास्क पाकिस्तानला दिले आहेत. नेदरलॅंड्सनेही चीनकडून मागवलेले मास्क परत पाठवले आहेत. देशातील आरोग्य विभागाने आखून दिलेल्या दर्जाप्रमाणे हे मास्क नसल्याचे नेदरलॅंड्सचं म्हणणं आहे.

“आता आम्ही इटलीला तसेच इतर विकसनशील देशांना मदत करत असल्याचा दावा चीनमधील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. चीनने जगभरातील देशांना मदत करायलाच हवी. चीनमधूनच या विषाणूचा जगभरामध्ये फैलाव झाल्याने त्यांनी इतर देशांना मदत करणं हे त्याचे कर्तव्यच आहे. चीनने या विषाणूसंदर्भात इतर देशांना वेळीच माहिती दिली असती तर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करता आल्या असत्या,” असा दावा या अधिकाऱ्याने ‘द स्पेक्टेटर’शी बोलताना केला आहे.