जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचे रुग्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत. भारतामधील करोनाग्रस्तांचा आकडा १४० च्या वर पोहचला आहे. जम्मू-काश्मीरलाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यामध्ये लडाख भागात एक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आला आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यातील काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विजेच्या बिलांसंदर्भात स्थानिकांना दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे.

एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कारगीलमधील माहिती आणि जनसंपर्क विभागाने स्थानिकांनी वीजेची बिलं नंतर भरली तरी चालेल असं म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने देशातील अनेक राज्ये वेगवेगळे निर्णय घेत असताना जम्मू-काश्मीरमधील लडाख भागातील प्रशासनाने ही सूचना जारी केली आहे. एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील लोकांना बँकांमध्ये जाऊन वीजबिलं भरण्याची गरज नाही. राज्यामधील वातावरण सामान्य झाल्यानंतर बीलं भरली तरी चालणार आहे. देयक भरण्याची तारीख निघून गेली तरी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये आजही बँकांच्या माध्यमातून वीजबिले भरली जातात. त्यामुळे दरवेळी बील भरण्याच्या शेवटच्या तारखेला बँकांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.