देशभरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तबलिगी जमातसाठी काम करणाऱ्या लोकांनी करोना विषाणूंचे वाहक म्हणून काम केल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला.
तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असतं असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तबलिगी जमातने गुन्हा केला असून त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उत्तर प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित तीन हजार लोक सापडले असल्याचा दावा केला आहे.
“आजार होणे हा गुन्हा नाही. पण करोनासारखा आजार लपवून ठेवणे हा नक्कीच गुन्हा आहे. ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
आणखी वाचा- IAS अधिकाऱ्याकडून तबलिगींचा ‘हिरो’ म्हणून उल्लेख, सरकारकडून कारणे दाखवा नोटीस
दरम्यान उत्तर प्रदेशात आतापर्यंत करोनाचे २३२८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६५४ जणांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. तर एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार सर्वात जास्त रेड झोन जिल्हे उत्तर प्रदेशात आहे उत्तर प्रदेशातील १९ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तर ३६ जिल्हे ऑरेंज झोन आणि २० जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 12:36 pm