भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात ९,९८५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. देशाच्या वेगवेगळया भागात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान देशात प्रथमच करोनामुक्त झालेल्यांची संख्या अॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.
आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही करोना व्हायरससाठी उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७,७४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील करोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेले नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या वुहानला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. वुहानमध्ये ८४ हजार रुग्ण होते.
जून महिन्यात मुंबईत दरदिवशी करोनामुळे सरासरी ५३ मृत्यू
मुंबईत एकाबाजूला करोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेय तर दुसऱ्या बाजूला करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून महिन्यातल्या पहिल्या नऊ दिवसात करोनामुळे दररोज सरासरी ५३ मृत्यू झाले आहेत. हेच मे महिन्यात शेवटचे नऊ दिवस करोनामुळे दररोज सरासरी ४१ मृत्यू झाले होते.
मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात मुंबईत करोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी करोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 11:19 am