संसर्गजन्य आजारांना कारणीभूत असणाऱ्या विषांणूंवर अमेरिकेपेक्षा चीन जास्त सक्षम आणि प्रभावीपणे काम करु शकतो हे सिद्ध करण्यासाठी चीनने वुहान येथील प्रयोगशाळेमधून करोना विषाणू पसरवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेवर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असं अमेरिकन प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील वृत्त ‘फॉक्स न्यूज’ने दिलं आहे. हा दावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेमध्ये चीनने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा संदर्भ दिला जात आहे. अमेरिकेपेक्षा आपण अधिक श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी चीनने कोरनाचा फैलाव केल्याचा दावा अमेरिकेमधील प्रशासनाशी संबंधित काही सुत्रांनी केल्याचे ‘फॉक्स न्यूज’ने म्हटले आहे.

वटवाघुळाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग मानवाला होऊ शकतो का यासंदर्भातील संशोधन वुहानमधील प्रयोगशाळेमध्ये सुरु होते. त्याचवेळी ‘पेशंट झिरो’ म्हणझेच ज्याला पहिल्यांदा करोना विषाणूचा संसर्ग झाला अशी व्यक्ती वुहानमधील स्थानिकांच्या गर्दीमध्ये फिरत राहिल्याने संसर्ग वाढत गेल्याचा दावा प्रशासनामधील सुत्रांनी केला आहे. चीन सरकारने करोना संसर्ग आणि त्याबद्दलची माहिती लपवून ठेवल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. चीनमधील करोना संसर्गाबद्दल उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डॉक्युमेंट म्हणजेच सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा दावा केला जात आहे. करोना म्हणजे चीन सरकारने आतापर्यंत केलेला सर्वात महागडी लपवाछपवी असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.

सध्या चर्चेत असलेल्या चीनसंदर्भाती वेगवेगळ्या शक्यतांसंदर्भात बुधवारी फॉक्स न्यूजने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी, “वेगवेगळ्या गोष्टींची सध्या चर्चा सुरु आहे. आम्ही सध्याच्या भयंकर परिस्थितीसंदर्भात सखोल चौकशी करत आहोत” असं उत्तर दिलं. वुहानमध्ये मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजारामधून वटवाघुळाच्या मांसाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग मानवामध्ये झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र या बाजारामध्ये वटवाघुळाचे मांस विकलेच जात नसल्याचा दावा अमेरिकन प्रशासनातील सुत्रांनी केला आहे. खरी माहिती लपवण्यासाठी चीनने मुद्दाम मांसविक्री बाजाराचा आधार घेतल्याचे सांगितले जात आहे.

नक्की वाचा >> वुहानमधील ‘त्या’ प्रयोगशाळेचे अमेरिका कनेक्शन; धक्कादायक खुलाशामुळे अमेरिकन नेतेही चक्रावले

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मंगळवारी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार चीनमधील अमेरिकन दुतावासाने वुहानमधील वुहान इन्सटिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेमध्ये सुरक्षित पद्धतीने प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत २०१८ साली जानेवारी महिन्यात व्यक्त केले होते. येथील शास्त्रज्ञ वटवाघुळांमधून मानवाला होणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अभ्यास करत असल्याचेही यावेळी स्पष्ट कऱण्यात आलं होतं.

करोना विषाणूची रचना ही नैसर्गिक नसल्याचेही अमेरिकेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी यासंदर्भात बोलताना, “वुहानमध्ये व्हायरोलॉजी प्रयोगशाळा आहे. ती मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजरपेठेपासून काही अंतरावर आहे. करोना विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान येथून सुरु झाला, इतक्याच गोष्टी सध्या आपल्याला ठामपणे ठाऊक आहेत. मात्र या गोष्टींबद्दल आणि करोनाचा फैलाव कसा होत गेला यासंदर्भात अमेरिकन सरकार तपास करत आहे,” अशी माहिती दिली.

चीन करोनासंदर्भातील माहिती लपवत आहे. करोनाचा संसर्ग ज्या भागांमध्ये झाला त्या भागांची माहिती, करोनासंदर्भातील सुरुवातीचे अहवाल आणि संशोधनातील बरीचशी माहिती लपवली जात असल्याचा दावा सुत्रांनी केल्याचे वृत्त फॉक्स न्यूजने दिले आहे.

करोना विषाणूचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकांनी चीनसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. वुहान येथील व्हायरोलॉजी इन्स्टीट्यूटमध्ये (Wuhan Institute of Virology) प्रयोगादरम्यान करोनाचा विषाणू पसरला गेल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यानंतर चीनने याचा संसर्ग मांसविक्री होणाऱ्या बाजारातून झाल्याची माहिती दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखालील ‘कोबरा’ या आपत्कालीन गटातील सदस्यानेही वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू पसरत गेल्याचे तर्क विश्वास ठेवण्यासारखे असल्याचे मत नोंदवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वुहानमधील या प्रयोगशाळेशी संबंधित काही कागदपत्रांच्या आधारे डेली मेलने एक धक्कादायक वृत्त काही दिवसांपूर्वी दिलं होतं. या कागदपत्रांनुसार अमेरिकन सरकारने विषाणूंवर संशोधन करणाऱ्या या प्रयोगशाळेला २८ कोटींचा निधी दिला होता. मागील अनेक वर्षामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये हा निधी देण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील नेत्यांनाही मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.