जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. तसेच मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळण्यासंदर्भातील आवाहन करण्याबरोबरच अनेक देशांनी याबद्दल कठोर नियम केलेत. अशाच कठोर नियमांचा फटका नुकताच थायलंडच्या पंतप्रधानांना बसला आहे. थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. ओचा यांच्याकडून १९० डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. बँकॉकच्या राज्यपालांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. नुकताच थायलंडमध्ये मास्क न घालण्यासंदर्भातील गुन्ह्यासाठी दंड वाढवून ४७ हजार रुपये इतका करण्यात आला आहे.

ओचा यांनी आपल्या फेसबुक पेजवर एका बैठकीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्यांनी मास्क घातलेलं दिसलं नाही. याच फोटोच्या आधारे बँकॉकचे राज्यपाल असाविन क्वानमुआंग यांनी तक्रार केली. याबद्दलची माहिती क्वानमुआंग यांनीच आपल्या फेसबुक पेजवरुन दिली. पंतप्रधानांनी करोनासंदर्भातील नियम मोडल्याची तक्रार मी केलीय, असं क्वानमुआंग यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं होतं.

थायलंडमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्या रोखण्यासाठी कठोर निर्बंध लावून लोकं त्या नियमांचे, निर्बंधांचे पालन करावे म्हणून जास्तीत जास्त दंड आकारण्याची भूमिक स्वीकारली आहे. थायलंडमध्ये नुकताच मास्क न घालण्यासंदर्भातील दंड वाढवून ६४० डॉलर म्हणझेच ४७ हजार रुपये इतका करण्यात आलाय. देशातील ४८ प्रांतांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. थायलंडमध्येही करोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये कमीत कमी लोकांना करोनाचा संसर्ग व्हावा म्हणून सरकार कठोर नियम बनवून त्यांची अंमलबजावणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थेट पंतप्रधानांकडूनही झालेल्या चुकीसाठी १९० डॉलरचा दंड आकारण्यात आलाय. हा दंड जुन्या नियमांनुसार आकारण्यात आलाय. या पुढे पुन्हा जर कोणताही शासकीय अधिकारी मास्क शिवाय दिसल्यास सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही ६४० डॉलर दंड भरावा लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.