कल्याण स्थानकामधून आंध्र प्रदेशमधील गुंतकल आणि बिहारमधील दानापूर येथे विशेष गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये गाडीमध्येच तुफान हणामारी झाल्याची वृत्त समोर आले आहे. ही गाडी कल्याणमधून निघाल्यानंतर मध्य प्रदेशमधील सतना येथे पोहचली असता मजुरांमध्ये वाटप करण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या पाकीटांवरुन हणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकावरुन मुंबई आणि परिसरात अडकलेल्या हातवर पोट असणाऱ्या मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांमधून आपल्या राज्यात जाण्यासाठी मोठी गर्दी कल्याण स्थानकात झाली होती. यापैकी १२०० मजुरांना बिहारला घेऊन जाणारी गाडी संध्याकाळच्या सुमारात मध्य प्रदेशमधील सताना स्थनकात पोहचल्यानंतर मजुरांना फूड पॅकेट देण्यात आले. मात्र यावरुनच मजुरांमध्ये हणामारी झाली. अनेकांनी एकमेकांना रेल्वेच्या सीटवर चढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. “आम्हाला फूड पॅकेट मिळाली नाहीत. कंपार्टमेंटमध्ये २४ पाकिटं वाटण्यात आल्याचे मी पाहिले. मात्र आमच्यापर्यंत ती आलीच नाहीत,” असं एका मजुराने सांगितल्याचे ‘एनडीटीव्ही’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करुन हे मजूर एकमेकांना मारत असताना संसर्गाच्या भितीने पोलिसांनीही गाडीच्या बाहेर उभं राहून प्लॅटफॉर्मवरुनच या भांडणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे ‘एनडीटीव्ही’ने म्हटलं आहे. पोलीस प्लॅटफॉर्मवरुनच खिडक्यांवर दांडक्यांनी मारत मजुरांना न भांडण्याचा सल्ला देत होते. अखेर मारामारी करुन थकल्यानंतर हे मजूर आपआपल्या जागेवर बसले. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ही ट्रेन निघाली होती.

कल्याणमधून सोडलेल्या या दोन ट्रेनमधून आपल्या राज्यात परत जाण्यासाठी मुंबईतील भाऊचा धक्का, विलेपार्ले, मशीद बंदर, वाडी बंदर या परिसरामधून हे मजूर आले होते.