करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमध्ये, भारतातील साथीचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४७,०९२ नवीन नविन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारताच्या दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली. देशात एकूण प्रकरणे १.१५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनातून बरे होण्याचा दर ९७.४८ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४७,०९२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याच्या एक दिवस आधी ४१,९६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ५०९ करोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर बुधवारी ३५,१८१ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत.

भारतात केरळमध्ये सर्वात जास्त रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. बुधवारी, केरळमध्ये कोविडचे ३२,८०३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर संक्रमणामुळे आणखी १७३ लोकांचा मृत्यू झाला. नवीन बाधितानंतर, करोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ४० लाख ९० हजार ३६ पर्यंत वाढली आहे तर मृतांची संख्या २०,९६१ वर पोहोचली आहे.

करोनाच्या सुरुवातीपासून एकूण तीन कोटी २८ लाख ५७ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३९ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी २० लाख २८ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण ३ लाख ८९ हजार लोकांना अद्यापही उपचाराधीन आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ सप्टेंबरपर्यंत देशभरात करोना लसीचे ६६ कोटी ३० लाख ३७ हजार डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ८१.०९ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नुसार, आतापर्यंत ५२ कोटी ५० लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे २० लाख करोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.