भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात”, असं दावाच साध्वी प्रज्ञा यांनी यावेळी केला आहे. या व्हिडिओवर सध्या अनेक तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

साध्वी प्रज्ञा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा यांनी गोमूत्राचे फायदे सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील करोना दुसऱ्या लाटेच्या कालावधीदरम्यान त्या म्हणाल्या होत्या कि, “मी करोनापासून वाचले. कारण, मी दररोज गोमूत्राचं सेवन करते.” एका कार्यक्रमादरम्यान १७ मे २०२१ रोजी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं होत कि, “गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. म्हणूनच मला करोनाचा संसर्ग झाला नाही.”

हनुमान चालीसा म्हणा, करोना बरा होईल!

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ऐन करोना काळात देखील अशा पद्धतीची वक्तव्य केली आहेत. जुलै २०२० मध्ये देखील त्यांनी अशाच पद्धतीचं एक वक्तव्य केलं होत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यावेळी करोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला होता. “चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करावं. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. तर ही अजब विधानांची आणि उपायांची मालिका अद्याप सुरूच आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

साध्वी प्रज्ञा ठाकूर सिंह यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आता अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने विचारलं कि, “जर गोमूत्र इतकं फायदेशीर असेल तर रुग्णालयांमध्ये देखील डॉक्टर देखील त्याचंच सेवन करण्याचा सल्ला का देत नाहीत?” तर फॅक्टचेक नावाचं अकाऊंट असलेल्या एका युझरने विचारलं आहे कि, “गोमूत्रात जरी सोडियम, पोटॅशियम, क्रिएटिनिन, फॉस्फरस आणि एपिथेलियल सेल्ससारखी खनिजं असली तरीही विज्ञान त्याच्या सेवनाचं समर्थन करत नाही.”