आयपीएलच्या तेराव्या हंगामातून चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने माघार घेतली आहे. खासगी कारण सांगत रैना भारतात परतला आहे. मात्र तो अशाप्रकारे मालिका सुरु होण्याआधीच परतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याच दरम्यान रैनाने ट्विटवरुन मंगळावारी पंजाब पोलिसांनी आवाहन केलं आहे. रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामध्ये काकांपाठोपाठ आता त्याच्या चुलत भावाचाही मृत्यू झाल्याची माहिती त्याने ट्विटमधून दिली आहे.

पंजाबमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर घडलेली घटना भयंकर आहे. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात माझ्या काकांचा जागीच मृत्यू झाला तर माझ्या आत्याला आणि चुलत भावाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान काल रात्री माझ्या भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. माझ्या आत्याची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं रैनाने ट्विट करुन म्हटलं आहे.

त्या रात्री नक्की काय झालं हे अजून आम्हाला समजलेलं नाही. मी पंजाब पोलिसांना आवाहन करतो की त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा. यांच्याबरोबर हे कृत्य कोणी केलं हे जाणून घेण्याचा हक्क आम्हाला आहे. त्या गुन्हेगारांना अशाप्रकारे भविष्यातही गुन्हे करण्यासाठी मोकाट सोडता येणार नाही, असं रैनाने ट्विटरवरुन म्हटलं आहे.

काकांचा मृत्यू

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाच्या ५८ वर्षीय काकांची हत्या झाली होती. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील चार जण जखमी झालेत. अशोक कुमार असे रैनाच्या काकांचे नाव असून ते सरकारी ठेकेदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान घडली. अशोक कुमार यांचे ज्येष्ठ बंधू श्याम लाल यांनी ते रैनाचे काका असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

हल्ल्याबद्दल  काय माहिती समोर आली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने रैनाच्या काकांच्या घरात घुसले. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक गुलनीतसिंग खुराणा यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी घर फोडून काही रोकड आणि सोनं लुटलं. कुमार यांची ८० वर्षांची आई सत्या देवी, त्यांची पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कुशल हे चौघे या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती आहे.