भाजपाचे सहा ते सात खासदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या ज्योतीप्रिया मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसचे ५० आमदार पुढील महिन्यात पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप तसंच दावे-प्रतिदावे केले जात असतानाच तृणमूल खासदाराच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“जर मी निर्णय घेतला तर तुम्हाला १६ जानेवारीला दुपारी २ वाजता माहिती देईन,” अशी पोस्ट अभिनेत्री ते खासदार प्रवास करणाऱ्या शताब्दी रॉय यांच्या फेसबुक फॅन पेजवर करण्यात आली आहे. शताब्दी रॉय २००९ पासून बिरभूमचं प्रतिनिधित्व करत आहेत. ही पोस्ट शताब्दी रॉय यांच्या फॅन पेजवर असल्याने यामध्ये कितपत तथ्य आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे. मात्र ही पोस्ट पडल्यापासून शताब्दी रॉय यांचा फोन आऊट ऑफ रिच असल्याचं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.

आणखी वाचा- चेहऱ्याची अडचण!

या फेसबुक पोस्टमध्ये शताब्दी रॉय यांना मानसिक त्रास होत असून अनेक कार्यक्रमांना आपल्याला आमंत्रितच करण्यात न आल्याने अनुपस्थित असल्याचं म्हटलं आहे. “काही लोकांना आपली भेट व्हावी असं वाटत नाही. अनेक कार्यक्रमांची माहितीच मला दिली जात नाही. जर मला माहितीच नसेल तर मी कसं जाणार? यामुळे मानसिक त्रास होत आहे,” असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.

पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, “नवीन वर्षात मला तुमच्यासोबत राहता यावं यासाठी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. २००९ पासून तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल तसंच लोकसभेत पाठवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. भविष्यातही तुमचं हे प्रेम मिळत राहील अशी आशा आहे. मी खासदार होण्याआधीही बंगालच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार आहे. जर मी निर्णय घेतला तर १६ जानेवारीला दुपारी २ वाजेपर्यंत कळवेन”.

आणखी वाचा- प्रचार विरुद्ध विचार

तृणमूल काँग्रेसचे सौगाता रॉय यांनी शताब्दी रॉय यांच्या मानसिक त्रासाच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली असून आपण शनिवारपर्यंत वाट पाहू असं म्हटलं आहे. योगायोग म्हणजे तृणमूल काँग्रेसचे नेते रजीब बॅनर्जी हेदेखील १६ जानेवारीला दुपारी ३ वाजता फेसबुक लाइव्ह करणार आहेत. १९ डिसेंबरला तृणमूलचे सात आमदार तसंच एका खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.