X
Advertisement

तौते चक्रीवादळाचा रौद्रवतार! घरं जमीनदोस्त, वादळी पावसाने झाडं उन्मळून पडली

Cyclone Tauktae Updates : पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

तौते चक्रीवादळाने हळूहळू रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या टप्यात दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झालं. मात्र, आता त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून, केरळ, तामिळनाडूमध्ये त्याचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक घरांचं नुकसान झालं आहे. झाडं कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून, सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. कासरगोड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात वाऱ्याच्या वेगानं दुमजली इमारत कोसळताना दिसत आहे.

किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला आहे. वलियाथुरा येथील ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचं नुकसान झालं आहे. समुद्राच्या लाटा आदळत असल्यानं पुलाला तडे गेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलाचं नुकसान झालेलं होतं. पुल वाकला असून, त्यामुळे पुलाकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही दक्षता घेतली जात आहे. कोकण किनारपट्टी लगत असलेल्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, चक्रीवादळासंबधी गावोगाव जनजागृती केली जात आहे.

१८ मे रोजी गुजरातमध्ये धडकणार

अरबी समुद्रातील चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून जवळपास तीनशे किमी अंतरावर आहे. येणाऱ्या कालावधीत त्याचं रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची अंदाज असून, अरबी समुद्रातून याचा प्रवास सुरू होईल आणि गुजरातच्या किनारपट्टीवर १८ मे रोजी धडकेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दूरपासून हे वादळ जात असलं, तरी त्याचा परिणाम होईल, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

‘मुंबईच्या किनारपट्टीवर एनडीआरएफ’च्या तुकड्या

सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या चक्रीवादळाचा परिणाम दिसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर १४ तुकड्या अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

23
READ IN APP
X