पत्नीची व तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या दावनागिरी जिल्ह्यातील एका शालेय शिक्षकाला रविवारी बंगळुरुमधून अटक करण्यात आली. शिवाकुमार असे या शिक्षकाचे नाव आहे. तो चान्नागिरी शहरामध्ये राहतो. पत्नी श्वेताची हत्या करुन, तो या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करत होता, असे पोलिसांनी सांगितले. शिवाकुमार आणि श्वेता यांचा प्रेमविवाह होता. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.

श्वेताची वेदामुर्ती नावाच्या एका युवकाबरोबर ओळख झाली. तो बेरोजगार होता. शिवाकुमारला त्यांची मैत्री मान्य नव्हती. त्याने पत्नीपासून दूर राहण्याचा वेदामुर्तीला अनेकवेळा इशाराही दिला होता. ऑक्टोबर महिन्यात पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर श्वेता घरातून निघून गेली. २८ ऑक्टोबरला शिवाकुमारला श्वेता आणि वेदामुर्ती तुंगबद्रा नदीकाठी एकत्र असल्याचे समजले. शिवाकुमार आणि त्याचा भाऊ शिवराज तिथे गेले. वेदामुर्ती बरोबर बोलायचे आहे असे सांगून त्यांनी श्वेताला घरी पाठवून दिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शिवाकुमार आणि शिवराजने पट्ट्याने गळा आवळून वेदामुर्तीची हत्या केली व त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. श्वेता घरी पोहोचल्यानंतर वेदामुर्तीची हत्या झाल्याचे तिला समजले. त्यावरुन दोघा पती-पत्नींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे पोलिसांनी सांगितले. दोघे मुलांना घरातच ठेवून बाहेर पडले. २९ ऑक्टोबरच्या सकाळी शिवाकुमारने पत्नीची गळा आवळून हत्या केली व गावाजवळच्या विहिरीत तिचा मृतदेह टाकून दिला.

आणखी वाचा- माहेरी गेलेल्या पत्नीचा प्रियकर असल्याचं कळताच आधी प्रियकराची हत्या केली; नंतर…

दुसऱ्यादिवशी वेदामुर्ती आणि श्वेताचा मृतदेह वेगवेगळया ठिकाणी सापडले. पती शिवकुमारने श्वेताच्या कुटुंबीयांना फोन करुन तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. दावनगिरीमधील पोलिसांच्या विशेष टीमने बंगळुरुतून बहिणीच्या घरातून शिवकुमारला अटक केली. पोलीस शिवकुमारचा भाऊ शिवराजचा शोध घेत आहेत.