आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आपमधील माझा प्रवास संस्मरणीय होता. आता हा प्रवास संपुष्टात आला असून वैयक्तिक कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या जन्मात तरी मी आशुतोष यांचा राजीनामा स्वीकारू शकत नाही असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, मयांक गांधी, शाझिया इल्मी, कुमार विश्वास आणि आशुतोष यांचा समावेश होता. यातील आशुतोष हे पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात आले. आम आदमी पक्षात सामील होण्यापूर्वी आशुतोष हे ख्यातनाम हिंदी वृत्तवाहिनीत कार्यरत होते.

राज्यसभेच्या उमेदवारीवरुन आशुतोष यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद झाले होते. पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने आशुतोष नाराज झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात फारसे सक्रीय देखील नव्हते. दुसऱ्या पुस्तकाचे काम हाती घेतल्याने सक्रीय नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. याआधीही त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारण्यात आला नव्हता असं सांगण्यात येत आहे. अखेर आज आशुतोष यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीनामा दिल्याचे जाहीर केले. मात्र त्याला ट्विटरद्वारेच उत्तर देत आशुतोष यांचा राजीनामा या जन्मात तरी स्वीकारणं शक्य नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

अखेर बुधवारी आशुतोष यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. मी पक्षातील सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.