दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करोना चाचणी अहवाल आला असून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी सौम्य ताप तसंच सर्दी झाल्याने खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतलं होतं. अरविंद केजरीवाल करोना चाचणी केली जाणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे चाचणी करण्यात आली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रविवारी केजरीवालांना सौम्य ताप आला होता व त्यांचा गळा सुद्धा खराब झाला होता. करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांची करोना चाचणी करण्यात आली. दिल्लीत निर्बंध शिथील झाल्यापासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजारी असल्यामुळे केजरीवाल यांच्या सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. पण केजरीवाल यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिल्लीकर सोबत राज्य सरकारलाही दिलासा मिळाला आहे.

“दिल्लीत जुलै महिन्याच्या अखेरीस साडे पाच लाखांहून अधिक रुग्ण असतील”
दिल्लीत करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसून जुलै महिन्याच्या अखेरीस राजधानीत साडे पाच लाख रुग्ण असतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सध्याच्या डबलिंग रेट पाहता ही भीती व्यक्त केली आहे. दिल्ली सरकारने बाहेरी रुग्णांची तपासणी न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण नायब राज्यपालांनी निर्णय रद्द केला. यामुळे रुग्णायतील बेड्सच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे.

करोना रुग्णांची संख्या दर १२ ते १३ दिवसांनी दुपटीने वाढत आहे असं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि काही वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडे पाच लाख करोनाचे रुग्ण असतील. तसंच ८० हजार बेड्सची गरज भासणार आहे,” असं मनिष सिसोदिया यांनी यावेळी सांगितलं.