माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयात मोदी सरकारचे व्यवस्थापन चुकल्याची टीका गुरुवारी राज्यसभेत केली. मात्र त्यानंतर दुपारच्या जेवणावेळी आजी माजी पंतप्रधान हस्तांदोलन करताना दिसले. यासोबत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासोबतदेखील संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील नोटाबंदीच्या चर्चेत सहभाग घ्यावा, अशी विरोधकांची मागणी होती. गुरुवारी पंतप्रधान मोदी राज्यसभेत उपस्थित राहिले. यावेळी काँग्रेसकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर मुद्देसूद भाषण केले. ‘मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे संघटित आणि कायदेशीर लूट आहे,’ असे म्हणत मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘मोदी सरकारचा निर्णयामागील उद्देश चांगला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करताना लोकांना त्रास होतो आहे. लोकांना बँकांच्या रांगांमध्ये कित्येक तास उभे राहावे लागते आहे. दोन आठवडे होऊनही या रांगा कमी झालेल्या नाहीत. सरकारचे व्यवस्थापन पूर्णपणे चुकल्यामुळे स्थिती बिकट बनली आहे,’ असे म्हणत मनमोहन सिंग यांनी सरकारच्या धोरणातील उणिवा दाखवून दिल्या.

सामान्य आणि गरीब माणसाला होणाऱ्या त्रासावर पंतप्रधान मोदी काहीतरी उतारा शोधून काढतील, त्यांची अडचण दूर करतील, अशी आशा मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. ‘असंघटित क्षेत्र, शेती आणि लघुउद्योगांना नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे लोकांचा देशाच्या चलनावरील आणि बँकिंग यंत्रणेवरील विश्वास उडतो आहे,’ असे मुद्दे सिंग यांनी संसदेत बोलताना मांडले.

‘सरकारच्या उपाययोजना पाहता निर्णयाच्या अंमलबजावणीतील व्यवस्थापनात गंभीर चुका झाल्या आहेत. सरकारचे संपूर्ण व्यवस्थापन चुकले आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे संघटित लूट आहे,’ असा घणाघात सिंग यांनी राज्यसभेत केला. ‘सरकारच्या नियोजनातील त्रुटी दाखवणे हे माझे उद्दिष्ट नाही. पंतप्रधानांनी या स्थितीतून मार्ग काढावा. सामान्यांची त्रासातून सुटका करावी. लोकांना दिलासा द्यावा,’ अशी अपेक्षा मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.