राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलांची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाणार असून, यात खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या मंत्र्यांवरील भार हलका करण्याचे संकेतही सूत्रांनी दिले. या पाश्र्वभूमीवर मंत्र्यांवर कारवाई होणार का, याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत. त्याचबरोबर पुढील वर्षी राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यातील अपयशाचा फटका मंत्र्यांना बसू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. पंतप्रधान व शहा यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. शिवसेनेच्या कोटय़ातील जागा भरण्यास विलंब लागणार असल्यास भाजपच्या कोटय़ातील जागांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल असे सांगतानाच मंत्रिमंडळात मित्रपक्षांचाही समावेश केला जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवसेनेची तयारी नसल्यास मंत्रिमंडळात सेनेच्या सदस्यांचा नंतर समावेश केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाचा विस्तार लगेचच केला जाणार आहे. त्यात एखाद-दुसऱ्या मंत्र्याला वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या काही मंत्र्यांकडे तीन-चार खात्यांचा कारभार आहे. यामुळे काही खात्यांना न्याय देणे मंत्र्यांना शक्य होत नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना चिमटा काढल्याचे मानले जाते.

भाजप मंत्र्यांवर टांगती तलवार

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर मार्च २०१७ मध्ये सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची सूचना अमित शहा यांनी केली आहे. या निवडणुकीत खराब कामगिरी झाल्यास काही मंत्र्यांना नक्कीच वगळावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करा, अन्यथा घरी जा, असा सूचक इशारा सर्व मंत्र्यांना देण्यात आला आहे. अलीकडेच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मर्यादित यश मिळाले. या पाश्र्वभूमीवर सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लावले आहे. आपापल्या विभागांमध्ये आतापासून मंत्र्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. पक्षाने साऱ्याच मंत्र्यांना आतापासूनच दमात घेतले आहे. याबरोबरच पक्षांतर्गत धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

पंकजा मुंडे यांना अभय

मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ावरून केलेल्या विधानामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या वादात सापडल्या आहेत. पंकजा यांच्या पतीचा मद्यनिर्मितीचा कारखाना असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या साखर कारखान्यांमध्ये मळीपासून मद्यार्कनिर्मिती केली जाते त्याचे काय, असा सवाल करत फडणवीस यांनी पंकजांचे समर्थन केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. शिवसेनेच्या कोटय़ातील जागा भरण्यास विलंब लागणार असल्यास भाजपच्या कोटय़ातील जागांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल. मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल.

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री