घर म्हटले की वादविवाद आणि खटके उडणे हे आलेच. ब्रिटनचे राजघराणेही याला अपवाद नाही. इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही भांड्याला भांडे लागले असून त्यामुळे प्रिन्स हॅरी आणि राजघराण्याच्या सूनबाई आणि हॉलिवूड अभिनेत्री असलेली मेगन मर्केल लवकरच राजवाडा सोडणार आहेत. हे दोघेही लवकरच नवीन घरात राहायला जाणारा असल्याची चर्चा आहे. आता राजघराण्याचा राजवाडा सोडून दुसरीकडे राहायला जाण्याचे नेमके कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर थोरल्या सूनबाई केट मिडल्टन आणि धाकट्या सूनबाई मेगन मर्केल यांचे आपापसात खटके उडू लागल्याने प्रिन्स हॅरीने हा निर्णय घेतला आहे. फ्रॉगमोर हाऊस हे राणी एलिझाबेथ यांनी प्रिन्स हॅरीला लग्नाची भेट म्हणून दिले होते.

आता राजवाडा सोडून हे दोघे नेमके राहणार तरी कुठे? तर फ्रॉगमोर हाऊस या १० खोल्यांच्या नव्या घरात ते राहायला जाणार आहेत. १९ मे २०१८ रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राजकारणी वगळता जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना लवकरच बाळ देखील होणार आहे. मेगननं बाळाला जन्म दिल्यानंतर रॉयल बेबीसह हे कुटुंब नव्या घरात राहायला जाणार आहे. सध्या ते दोघे सध्या केंजिंग्टन पॅलेस म्हणजेच मुख्य राजवाड्यातील दोन खोल्यामध्ये राहातात. वेगळे होण्यापेक्षा राजवाड्यातीलच एका अपार्टमेंटमध्ये राहाण्याचा निर्णय हॅरी आणि मेगन यांनी घेतला होता. मात्र त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम यांच्यातही विसंवाद वाढल्याने त्यांनी मुख्य राजवाडाच सोडण्याचा निर्णय प्रिन्स हॅरीने घेतला आहे.

शाही कुटुंबात मेगन खूप तणावाखाली वावरत असल्याची चिंता तिच्या वडिलांनी तिच्या लग्नानंतर दोन महिन्यांतच व्यक्त केली होती. ती सध्या खूपच घाबरलेली असते, मला तिच्या डोळ्यांतून हे दिसतं. तिच्या वागण्या, बोलण्यातून अगदी हसण्यातूनही तीची भीती स्पष्ट जाणवते. शाही कुटुंबात रुळण्यास तिला अडचणी येत आहे. ती सतत तणावाखाली वावरत असते असे ते एका मुलाखतीत बोलले होते. राजघराण्याची सदस्य झाल्यापासून मेगनच्या वागण्या बोलण्यापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहे. इतकंच नाही तर पेहरावाच्या बाबतीतही तिला शाही घराण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागत आहेत. अनेकवेळा हे नियम मोडले गेल्यानं तिच्यावर समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. याच शाही नियमाचं दडपण तिला आहे असं थॉमस मार्कल यांचं म्हणणं आहे.