गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याकडून सोमवारी वडोदऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नमो टॅबचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विजय रूपानी यांनी म्हटले की, या निर्णयामुळे कोणताही विद्यार्थी डिजिटल जगापासून वंचित राहणार नाही. आम्ही मतांच्या राजकारणासाठी टॅबचे वाटप करत असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र, गुजरातच्या तरूणांनी जागतिक पातळीवर जावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे हे नमो टॅब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुदर्शन चक्रासारखे आहे. विद्यार्थ्यांना नमो टॅब देणे म्हणजे त्यांच्या हाती भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र देण्यासारखे आहे. त्यामुळे ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या बोटाच्या एका क्लिकवर आले आहे, असे रूपानी यांनी सांगितले. यावेळी रूपानी यांनी मोदी सरकारची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मोदी सरकार हे काही दुबळ्यांसाठी नाही. या सरकारचे नेतृत्त्व ५६ इंची छाती असणारे पंतप्रधान मोदी करत आहेत, असेही रूपानी यांनी म्हटले.

गुजरात सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील तीन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केवळ १००० रूपयात टॅब देण्याचे जाहीर केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार बाजारपेठेत या टॅबची किंमत सात ते आठ हजारांच्या आसपास आहे. यापूर्वी शुक्रवारी रूपानी यांनी गुजरात विद्यापीठातील सोहळ्यातही विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप केले होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला होता.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय पक्षांकडून लॅपटॉप आणि इतर गोष्टी देण्याची आश्वासने दिली जातात. कारण आपण जिंकणार नाही, हे त्या पक्षांना माहिती असते. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन त्यांचे काहीही नुकसान होत नाही. मात्र, नवी पिढी तशी नाही. ते फक्त मतदार नाहीत तर एक शक्ती आहे. आम्ही त्यांच्याकडे मतदार म्हणून नाही तर देशाची शक्ती म्हणून बघतो. त्यामुळे या टॅब वाटपासाठी सरकारकडून २०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे रूपानी सांगितले.