विविध पक्षांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद

सर्व विरोधी पक्षांची मंगळवारी एकत्र मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस त्यांना साथ देणार आहे, डावे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत जाण्यास अनुत्सुक आहेत, तर इतर पक्षांनी अजून याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही.

बहुतांश विरोधी पक्षांसाठी सामायिक असलेल्या आणि मोदी सरकारच्या विरोधातील मुद्दय़ांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने उद्या नवी दिल्लीत बैठक आयोजित केली असून, निश्चलनीकरणाचा मुद्दा विषयांच्या अग्रस्थानी राहण्याची अपेक्षा आहे. यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

निश्चलनीकरण आणि पंतप्रधानांचा वैयक्तिक भ्रष्टाचार या मुद्दय़ांवर काँग्रेस उद्या विरोधी पक्षांची बैठक आयोजित करत आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले.

काँग्रेसचा हा प्रयत्न अगदीच फुसका बार ठरेल असे नसले, तरी विरोधी पक्षांची अर्धवट उपस्थिती लक्षात घेता पत्रकार परिषदेत फारशी फटाकेबाजी होईल असे दिसत नाही.

अलीकडेच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जद (यू) वगळता बहुतांश विरोधक जादा मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मुद्दय़ावर सरकारविरुद्ध एकत्र होते. मात्र इतर पक्षांशी चर्चा न करता वा त्यांना आमंत्रण न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले असून त्याचाच फटका काँग्रेसला अजूनही बसतो आहे.

कुठल्याही गोष्टीसाठी मिळून प्रयत्न करताना परस्पर समन्वय आणि संवाद आवश्यक आहे याची काँग्रेसला जाणीव असायला हवी, असे सांगून माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी आपला पक्ष उद्या काँग्रेससोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.नोटाबंदीच्या चुकीच्या अंमलबजावणीबाबत विरोधक एकत्र आहेत, मात्र उद्याच्या पत्रकार परिषदेत हजर राहण्याचा आमचा विचार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी म्हणाले. समाजवादी पक्षानेही याबाबत अद्याप भूमिका घेतलेली नाही. बहुजन समाज पक्षही या कार्यक्रमात सहभागी न होण्याचीच दाट शक्यता आहे. केवळ तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या बैठकीला तसेच पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.

मोदींनी शिक्षेसाठी चौकशोधून ठेवावालालूप्रसाद

पाटणा : निश्चलनीकरणाच्या ५० दिवसांनंतर त्रास सुरुच राहिल्यास आपल्याला शिक्षा करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा दाखला देत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानांनी स्वत:च्या शिक्षेसाठी ‘चौक’ शोधून ठेवावा, अशा शब्दांत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. राजदच्या २८ डिसेंबरच्या राज्यस्तरीय धरणे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्याला देशातील जनतेचा पाठिंबा असल्याच्या भ्रमात मोदी वावरत आहेत. देशात आज निवडणुका घेतल्या तर भाजपचा पराभव होईल. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव होईल, असे लालूप्रसाद म्हणाले.