*मुंबईतून दररोज ५० आगमन-उड्डाण * राज्यांच्या स्वतंत्र नियमावलीमुळे संभ्रम कायम

नवी दिल्ली : टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज ५० विमानांची ये-जा होणार आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची भूमिका केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या कानावर घातली होती. राज्यातील जनतेशी रविवारी दुपारी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून प्रवासी विमान सेवा नकोच, अशी भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच राज्य सरकारने भूमिका बदलली.  मुंबईतून दररोज २५ विमानांचे उड्डाण तर २५ विमाने अन्य शहरांतून येतील, असे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी जाहीर के ले. तसेच राज्य सरकारच्या वतीने लवकरच नियमावली जाहीर के ली जाईल, असे ट्वीट मलिक यांनी के ले. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता, देशांतर्गत विमान सेवा मुंबईतून सुरू व्हावी, अशी आग्रही भूमिका केंद्राने मांडली. केंद्राच्या विनंतीनंतरच महाराष्ट्र सरकारने निर्णय बदलल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.

राज्यांची स्वतंत्र नियमावली

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रविवारी विविध विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. मात्र, त्यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.

रिक्षा-टॅक्सीवरील बंदीचे काय ?

महाराष्ट्र सरकारने दररोज ५० विमानांची ये-जा करण्यास परवानगी दिली असली तरी सोमवारपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार का, याबाबत संदिग्धता होती. कारण मुंबईतून टाळेबंदीच्या काळात रिक्षा-टॅक्सी सेवेला बंदी आहे. विमानतळावर प्रवासी आल्यावर ते पुढील प्रवास कसा करणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल.

केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

– विमानतळ, रेल्वे स्थानक व बस स्थानकावर प्रवाशांची निर्गमन कक्षात आल्यानंतर तापाची तपासणी करण्यात यावी त्याशिवाय त्यांना सोडू नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.

– ज्या लोकांमध्ये लक्षणे नाहीत अशांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात यावे.

– प्रवाशांना तिकिटे देताना त्यावरच नियमावली सादर करण्यात यावी. देशांतर्गत प्रवासाचे नियम सर्व प्रवाशांना समजावेत अशी व्यवस्था करण्यात यावी.

-सक्ती नसली तरी प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वैमानिकांनाही चिंता : विमान कंपन्या उड्डाणांची तयारी करीत असताना वैमानिक आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी विलगीकरण गरजेबाबत सुस्पष्टता नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अनेकांनी विलगीकरण पद्धती, वैयक्तिक आणि कुटुंबाची सुरक्षितता आणि करोनाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात उड्डाण करणे याबाबत चिंता व्यक्त केली.