संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (DRDO) एक ३५ वर्षीय वैज्ञानिक हनीट्रॅपच्या जाळयात अडकला. या वैज्ञानिकाला हॉटेलमध्ये बंधक बनवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडा येथील एका हॉटेलमध्ये या वैज्ञानिकाला दिवसभर बंधक बनवून ठेवले होते. चार ते पाच जणांच्या टोळक्याने हे कृत्य केले. त्यांनी वैज्ञाानिकाच्या कुटुंबाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हा वैज्ञानिक सेक्टर ७४ च्या सुपरटेक केपटाऊनमध्ये राहतो. त्याला मसाच पार्लरमध्ये जायचे होते. त्यासाठी तो ऑनलाइन मसाजपार्लरचा शोध घेत होता. त्यावेळी तो संबंधित महिला आणि तिच्या साथीदारांच्या संपर्कात आला. त्याने जेव्हा फोन केला, तेव्हा समोरच्या माणसाने त्याला लॉजिक्स सिटी सेंटर येथे यायला सांगितले. शनिवारी संध्याकाळी हा वैज्ञानिक त्याच्या कारने लॉजिक्स सिटी सेंटर येथे पोहोचला. त्याने त्याची कार तिथे पार्क केली. त्याला एक माणूस तिथे भेटला, तो त्याला हॉटेलवर घेऊन गेला. त्यानंतर पाच जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या रुममध्ये या वैज्ञानिकाला बंधक बनवले.

त्याच्या पत्नीला फोन करुन १० लाख रुपयाची खंडणी मागितली. घरात लागणाऱ्या काही वस्तू आणायला जातोय, असे पत्नीला सांगून संध्याकाळी ५.३० वाजता या वैज्ञानिकाने घर सोडले होते. रात्री ११ वाजता त्याच्या पत्नीला खंडणीसाठी पहिला फोन आला. पत्नीने पोलिसात जाऊ नये, यासाठी तिला धमकावण्यात येत होते. तिने पैसे जमवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा इतकी रक्कम जमा करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन टीम्स बनवल्या. पोलिसांनी वैज्ञानिकाच्या मोबाइल लोकेशनचा शोध सुरु केला. त्यावेळी शेवटचे लोकेशन सेक्टर ४१ मधील आगाहपूर होते. पोलिसांनी सापळा रचला व रोख रक्कमेने भरलेली बॅग घेऊन वैज्ञानिकाच्या पत्नीला हॉटेलमध्ये पाठवले. “तीन जण हॉटेलच्या बाहेर थांबले होते. ते बॅग उचलण्यासाठी आले. दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघे निसटण्यात यशस्वी ठरले. एकाला पोलिसांनी पकडले. वैज्ञानिकाला ज्या खोलीत ठेवले होते, तिथे हा आरोपी पोलिसांना घेऊन गेला” असे अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले.

पोलिसांनी तिथून वैज्ञानिकाची सुटका केली व महिलेसह दोघांना अटक केली. फरार झालेल्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. मागच्या दोन ते तीन महिन्यात या गँगने तीन जणांना अशाच प्रकारे  बंधक बनवलं होतं. “महिन्याला १.४ लाख भरुन ते हॉटेल भाडयावर घ्यायचे” असे सेक्टर ४९ चे एसएचओ सुधीर सिंह यांनी सांगितले.