News Flash

काश्मीरमधील हिंसाचारामुळे अनंतनागची पोटनिवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिल्यानंतर अनंतनागची लोकसभेची जागा रिक्त झाली होती.

EC cancels Anantnag bypoll : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथील लोकसभेची पोटनिवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथील लोकसभेची पोटनिवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ मे रोजी याठिकाणी निवडणूक होणार होती. काश्मीर खोऱ्यातील सध्याची परिस्थिती निवडणुकांसाठी योग्य नाही. कालच पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दोन भारतीय जवानांचा बळी घेतला होता. तसेच कुलगाम येथे दहशतवाद्यांनी बँकेच्या एटीएम व्हॅनवर केलेल्या गोळीबारात पाच पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्करानेही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील तणाव आणखीनच वाढला आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिल्यानंतर अनंतनागची लोकसभेची जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांचे बंधू मुफ्ती तसद्दक हुसेन ही जागा राखतील, असा अंदाज आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत अनंतनागमधील पोटनिवडणुकीच्या नव्या तारखेची घोषणा केलेली नाही.

काश्मीरमधील श्रीनगर पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी हिंसाचार होऊन आठ जणांचा बळी गेला आणि केवळ सात टक्क्यांच्या आतच मतदान झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने यापूर्वीच अनंतनाग मतदारसंघातील पोटनिवडणूकही पुढे ढकलली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सुरक्षित वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी या परिसरात ७५ हजार सैनिक तैनात करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. मात्र, केंद्राने या भागात केवळ ३० हजार सैनिक किंवा निमलष्करी दलाच्या ३०० तुकड्याच तैनात करता येतील, असे म्हटले होते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवेळी सुरक्षेसाठी ७० हजार जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, आता केवळ एका मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने इतक्या मोठ्या सुरक्षेची मागणी केली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयानेच निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक पुढे ढकलण्याविषयी सुचवले होते. आम्ही सुरक्षेची हमी देऊ शकतो. मात्र, मतदानाचा टक्का किती असेल, याबाबत गृहमंत्रालयाने साशंकता व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:53 pm

Web Title: ec cancels anantnag bypoll amid on going violence in jammu and kashmir
Next Stories
1 १०० ग्रॅम दही ९७२ रुपये, १ लीटर तेल १,२४१ रुपये; रेल्वेच्या खरेदीत मोठा घोटाळा?
2 दिल्लीचा कौल हा ईव्हीएमचा नव्हे तर देशाचा कौल; अमित शहांचा केजरीवालांना टोला
3 अखेर हुतात्मा परमजीत सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार
Just Now!
X