पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या हाँगकाँगमधील संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार (पीएमएलए) नीरवची इथली सुमारे २५५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे त्याची आजवर एकूण ४७४४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


यापूर्वी ईडीच्या मुंबई कार्यालयाच्या चौकशी एजन्सीने नीरव मोदीच्या संपत्तीच्या जप्तीचे तीन आदेश दिले होते. त्यानुसार जी संपत्ती जप्त करण्यात आली होती त्यामध्ये हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, नीरव मोदी, नीरवचा अमेरिकेतील सहकारी मिहिर भंसाळी तसेच ए. पी. जेम्स आणि ज्वेलरी पार्क या कंपन्यांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. यामध्ये २१८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी सुरतमधील एका कोर्टाने हिरे व्यापारी नीरव मोदीला करचोरीच्या एका प्रकरणात फरार घोषित केले होते. डीआरआयने यासंदर्भात आयातीवर लागणाऱ्या सीमा शुल्कात कथीत चोरीविरोधात त्याच्याविरोधात खटला दाखल केला होता.

पीएनबी घोटाळा प्रकरणाची चौकशी सीबीआयकडूनही केली जात आहे. दरम्यान, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी देश सोडून पळून गेले आहेत. नुकतेच चोक्सी हा एंटीगुआ आणि बरमुडामध्ये असल्याचे समोर आले होते.