केजरीवालांचे आयोगावरच प्रत्यारोप; ‘सदिच्छादूत’ केल्यास दोन वर्षांत गैरवापर रोखण्याचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले. निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखण्याऐवजी निवडणूक आयोगाकडूनच पैशांच्या खेळाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मला आयोगाचे सदिच्छादूत केल्यास दोन वर्षांतच पैशांचा खेळ बंद करून दाखविण्याची भाषाही त्यांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी हे आरोप केले. गोव्यामधील प्रचारसभेमध्ये पैसे घेऊन मते देण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केल्याचा ठपका ठेऊन आयोगाने केजरीवालांना दोनच दिवसांपूर्वी कडक तंबी दिली होती आणि पुन्हा चूक केल्यास पक्षाची मान्यता रद्द करण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावर संतप्त झालेल्या केजरीवालांनी आयोगालाच दूषणे दिली. कालच त्यांनी आयोगावर पंतप्रधान कार्यालयाच्या ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप केला होता.

केजरीवालांनी पत्रात लिहिले आहे, ‘पैसे घेऊन मतदान करण्यासाठी मी भडकावीत असल्याचा तुम्ही ठपका ठेवलाय. पण मी काय चुकीचे बोलतोय? पैसे देणाऱ्यांनाच मत द्या, असे मी म्हणत असेन तरच तुमचा ठपका योग्य ठरेल. पण मी तर नेमके उलटे म्हणतोय. पैसे घ्या; पण मते दुसऱ्याला द्या.. माझ्या या एका विधानाने निवडणुकांमधील पैशांचा खेळ थांबेल. पैसे वाटूनही मते मिळत नसतील तर कोणता पक्ष पैसे वाटेल?’

गेल्या सत्तर वर्षांपासून तुम्ही पैशांचा गैरवापर थांबविण्यासाठी प्रयत्न करताय. पण त्यास अजिबात यश आलेले नाही. याउलट पैशांचा वापर वाढलाय. उघड उघड पैसे वाटले जातात; पण तुम्ही काहीच करू शकत नसल्याचा ठपका आयोगावर ठेवून ते पुढे म्हणतात, ‘मी जे म्हणतोय, ते २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मी खरे करून दाखविले आहे. भाजप, काँग्रेसने पैसे वाटले; पण जनतेने मला मते दिली. पैसे देऊनही फायदा होत नसल्याचे लक्षात आल्याने दिल्लीत भाजप व काँग्रेस पैसे वाटणार नाही. मला आयोगाने सदिच्छादूत नेमल्यास दोन वर्षांत पैशांचा खेळ थांबल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझे तोंड दाबून पैशांच्या गैरवापराला प्रोत्साहन देण्याऐवजी माझ्या विधानाचा प्रचार करा.’

मी जे म्हणतोय, ते २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मी खरे करून दाखविले आहे. भाजप, काँग्रेसने पैसे वाटले; पण जनतेने मला मते दिली. पैसे देऊनही फायदा होत नसल्याचे लक्षात आल्याने दिल्लीत भाजप व काँग्रेस यापुढे पैसे वाटणार नाही.

अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री