सच्चे पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय ६०) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झोपेत निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मध्य प्रदेशातील बांद्राभान येथील नर्मदेच्या तटावर आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्याच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा विशेष ठरावही संमत केला. तसेच शोक प्रगट करण्यासाठी देशभरातील सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वजही अध्र्यावर आणण्यात आले. दरम्यान, वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले दवे अविवाहित होते. त्यांच्यामागे इंदूरस्थित अभय दवे हे बंधू आहेत.

दररोज दोन वेळा न चुकता योगसाधना करणारे दवे प्रकृतीबाबत अत्यंत दक्ष मानले जायचे. मितआहार, नियमित योगाभ्यास आणि शिस्तशीर आयुष्य यांच्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दवे यांना जानेवारीमध्ये न्यूमोनिया झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती विलक्षणरीत्या ढासळली होती. मंत्रालयात फिरकणे जवळपास बंद झाले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना पर्यावरण मंत्रालयाची धुरा संसदेत सांभाळावी लागली होती. एप्रिलपासून त्यांची प्रकृती जरा सुधारली. ते मंत्रालयात येऊ लागले. अगदी बुधवारी दिवसभर ते बठकांमध्ये व्यस्त होते. जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीच्या (जीएम) वाणांच्या व्यावसायिक लागवडीच्या परवानगीविरोधात काढलेल्या मोच्र्याला ते सामोरे गेले. आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. सायंकाळी ते मोदींनाही भेटले होते. बहुधा चर्चा ’जीएम’ मोहरीच्यासंदर्भात असावी. गुरुवारी सकाळी ते कोईमतूरला जाणार होते. पण आदल्या रात्री त्यांना एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळी अखिल भारतीय आयुर्वज्ञिान संस्थेमध्ये (एम्स) नेईपर्यंत त्यांची जीवनज्योत मावळली होती.

६ जुल १९५६ मध्ये उज्जनजवळील बारनगर येथे जन्मलेल्या दवेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी नेते होते, नंतर संघप्रचारक बनले. नर्मदा नदी त्यांची जीव की प्राण. अगदी आताही न्यूमोनियाने ग्रस्त असताना ते नर्मदा अभियानात सहभागी झाले होते. ’चरैवेती चरैवेती’ आणि ’जन अभियान परिषद’ अशा दोन नियतकालिकांचे ते संपादन करायचे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते वैमानिक झाले होते. २००३ मधील उमा भारतींच्या मध्य प्रदेशातील विजयात त्यांचा मोठा वाटा होता. २००९ मध्ये ते प्रथम राज्यसभा खासदार झाले. २०१५ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. मागील वर्षीच ते वने व पर्यावरण मंत्री झाले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या जवळ असलेले दवे हे मोदींच्याही तितकेच निकटचे. मध्यंतरी शिवराजसिंह चौहानांना हटविण्याची चर्चा जोरात असताना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी दवेंच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.

नको स्मारक, नको छायाचित्रे शक्य झाल्यास झाडे लावा..

२३ जुल २०१२ रोजीच दवेंनी केलेल्या इच्छापत्रातून त्यांच्यातील सच्चा पर्यावरणवादी आणि अवडंबर माजविण्यापासून स्वतला दूर ठेवणारा राजकारणी दिसतो. एकीकडे राजकारण्यांमध्ये स्मारकांसाठी चढाओढ असताना दवेंनी स्पष्टपणे आपले स्मारक कदापि न उभारण्याची इच्छा व्यक्त केली. ’माझ्या नावाने स्मारक नको, पुरस्कार नको. माझी छाय़ाचित्रेही नकोत. जर माझ्यासाठी काहीतरी करायचे असेल तर झाडे लावा आणि त्यांना जगवा. मला खूप आनंद होईल. त्याशिवाय नदी संवर्धनाचेही काम करता येऊ शकेल. पण हे ही करताना माझे नाव कोठेही नको,’ असे सांगणारया दवेंनी स्वतचे अंत्यसंस्कार होशंगाबाद जिल्ह्णाातील बांद्राभानमधील नदी महोत्सव होत असलेल्या नर्मदेच्या तटावर वैदिक पद्धतीने आणि अन्य कोणतेही अवडंबर न करता करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

छत्रपती शिवराय आराध्य दैवत

छत्रपती शिवराय, विवेकानंद आणि भगतसिंह ही दवेंची आराध्य दैवते. शिवरायांबद्दलची त्यांची ओजस्वी भाषणे खूप गाजली. शिवरायांचे नुसते नाव काढताच त्यांच्यात विलक्षण चतन्य संचारायचे. शिवरायांच्या रणनीतीवर, प्रशासन कौशल्यावर लिहिलेले ’शिवाजी आणि सुराज्य’ हे त्यांचे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण मानले जाते. आधुनिक प्रशासकांनी शिवरायांच्या चारशे वर्षांपूर्वीच्या प्रशासकीय कौशल्याचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. ’जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग देशाबाहेर, विशेषत लंडनमधील वेम्ब्लेमध्ये आयोजित करण्यासाठी सर्वस्वी त्यांचा पुढाकार होता.

अनिल माधव दवे हे भोपाळमध्ये संघाचे विभाग प्रचारक होते तेव्हापासून माझे त्यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. संघाचे विभाग प्रचारक, भाजपच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा समर्थ कार्यकर्ता, पर्यावरणविषयक अनेक आंदोलनातील एक अग्रणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि नेतृत्वगुणांचा अभ्यासक तसेच खासदार व केंद्रीय मंत्री अशा अनेक भूमिकांतून काम करत असताना त्यांच्यातील नियोजनकौशल्य, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट भूमिका तसेच संवेदनशीलतेचा मी जवळून अनुभव घेतला आहे. अनिल दवे यांच्या निधनाने  दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला सात्विक कार्यकर्ता गमावला आहे.   मोहन भागवत, सरसंघचालक