भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात हॅकर सय्यद शुजा याने केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस- भाजपात जुंपली आहे. हॅकरची पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती, आशीष रे हे काँग्रेसच्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात आणि त्यांनी काही स्तभांमधून राहुल गांधींचे भरभरुन कौतुक केले होते, याकडे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा सवाल उपस्थित करत ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपाने केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा दावा अमेरिकेत राजकीय आश्रय मागितलेला भारतीय हॅकर सय्यद शुजाने सोमवारी केला होता. ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा त्याने केला होता. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते.  या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवासाठी काँग्रेस आत्तापासूनच कारणं शोधत आहेत. काँग्रेस पक्ष हा सुनियोजितपणे भारताचे संविधान आणि देशाच्या सर्वोच्च संस्थांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये देशात यूपीएची सत्ता होती, आम्ही सत्तेत नसतानाही ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात आरोप करण्यामागे काय तर्क आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.