तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

पाकिस्तानलगतच्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय हा अयोग्य आहे, त्यामुळे भारत व चीन यांच्यातील संबंध आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीन हा पाकिस्तानचा सदासर्वकालीन मित्र असून, त्यामुळे चीन-भारत संबंधात फरक पडू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने चौकशी केली, पण त्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कुठलेही पुरावे देता आले नाहीत, असे इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफ द शांघाय अॅकॅडमी या संस्थेचे हू झियोंग यांनी ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी अशी घोषणा केली होती, की भारत-पाकिस्तान यांच्यातील ३३२३ किलोमीटरच्या सीमेवर कुंपण घालण्यात येणार आहे व ते काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सीमा पूर्ण बंद केली तर त्यामुळे व्यापार व चर्चेत अडथळे येतील असे हू यांनी सांगितले. इन्स्टिटय़ूट फॉर सदर्न अँड सेंट्रल आशियन स्टडीज या संस्थेचे संचालक वँग देहुआ यांनी सांगितले, की सीमा बंद केल्याने शांतता प्रयत्नांना धक्का बसेल. यात भारताची शीतयुद्धकालीन मानसिकता दिसते. त्यातून भारतीय काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांमध्ये तणाव निर्माण होईल.  पाकिस्तान हा चीनचा मित्र आहे, त्यामुळे पाकिस्तान-चीन-भारत संबंध गुंतागुंतीचे होतील. पण काश्मीर प्रश्न सोडवणे हे चीनच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.