केद्र सरकारच्या कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवालांना लक्ष्य केलं आहे.

तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. याविरोधात भारत बंद पाळला असून, दुसरीकडे राजकीय कलगीतुराही बघायला मिळत आहे. आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (७ डिसेंबर) सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

आणखी वाचा- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नदरकैदेत, आपचा आरोप

या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवालांवर टीकास्त्र डागलं आहे. “एक अशी व्यक्ती जिने केंद्र सरकारने केलेले तिन्ही वादग्रस्त कायदे दिल्लीत लागू करण्यासाठी अजिबात उशीर केला नाही. तिच व्यक्ती आता सार्वजनिक ठिकाणी स्वतःला शेतकऱ्यांचा सेवक म्हणून घेत आहे. त्यांना गहू व तांदूळ यातील फरक तरी माहिती आहे का?” असा सवाल सिंह यांनी केजरीवाल यांना केला. अमरिंदर सिंह यांनी केजरीवाल यांना शेतकऱ्यांसाठी केलेल्या एक काम दाखवण्याचंही आव्हान दिलं आहे. आपने एका कायद्याची अधिसूचनाही काढली आहे, असा दावाही सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केला.

आणखी वाचा- ‘शाहीनबाग’प्रमाणेच आता साध्या-भोळ्या शेतकऱ्यांची दिशाभूल!

सोमवारी सिंघू सीमेवर जाऊन अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. “आपण मुख्यमंत्री म्हणून नाही, तर सेवक म्हणून आलो आहे. संपूर्ण पक्ष, पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आणि आपण स्वतः एक सेवक म्हणून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलो आहे. शेतकरी आज संकटात असून, देशवासीयांचा कर्तव्य आहे की, शेतकऱ्यांसोबत उभं राहावं आणि त्यांची सेवा करावी,” असं केजरीवाल म्हणाले होते.