सोमवारी अखेर भाजपने गुजरातमध्ये बहुमत मिळवले. पण एकतर्फी विजयाची अपेक्षा करत असलेल्या भाजपला मात्र धक्का बसला. १५० जागा मिळवण्याचा दावा केलेल्या पक्षाला तीन आकडी संख्याही म्हणजे १०० जागा ही मिळवता आल्या नाहीत. पक्षासाठी हा मोठा चिंतनाचा विषय आहे. गेल्या चार दशकांत गुजरातमध्ये कोणत्याही पक्षाने किंवा आघाडी सरकारने १०० पेक्षा कमी बहुमताने सरकार स्थापन केलेले नाही. पण १९७५ नंतर असं पाहिल्यांदाच होत आहे की, गुजरातमध्ये ९९ आमदारांच्या म्हणजे दुहेरी आकड्यांच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २००२ मध्ये जेव्हा गुजरात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा भाजपला १२७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या जागा कमी होतानाच दिसत आहेत. तत्पूर्वी वर्ष १९९८ मधील निवडणुकीत भाजपला ११७, १९९५ मध्ये १२१ जागा मिळाल्या होत्या. तर २००७ मध्ये ११७ आणि २०१२ मध्ये ११६ उमेदवार निवडून आले होते.

 

वर्ष १९९० मध्ये जनता दल आणि भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. तेव्हा या युतीचे १३७ उमेदवार विजयी झाले होते. १९७५ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७५ आणि नॅशनल काँग्रेस ऑर्गनायजेशनला (एनसीओ) ५६ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा एनसीओचे बाबूभाई पटेल मुख्यमंत्री झाले हेाते. काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. आता फक्त ९९ आमदारांच्या मदतीने भाजप गुजरातमध्ये सत्तारूढ होणार आहे. विधीमंडळाचा नेता निवडण्यासाठी पक्षाच्या संसदीय समितीने पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आहे. अरूण जेटली आणि सरोज पांडे लवकरच गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतील.

 

भाजपची सर्वांत निराशाजनक कामगिरी सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात झाली. येथील ५४ पैकी भाजपला फक्त २३ जागा मिळाल्या. वर्ष २०१२ च्या निवडणुकीत या ठिकाणाहून भाजपला ३५ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीवरून हे स्पष्ट झाले की, काठियावाड येथील पटेलांनी काँग्रेसला पुन्हा एकदा झुकते माफ दिले आहे. या परिसरातून आलेले निकाल हे १९८५ च्या निवडणुकीसारखे आहेत. त्यावेळी काँग्रेसने कच्छ येथील सहा जागांपैकी पाच आणि सौराष्ट्रातील ५२ पैकी ४३ जागा मिळवल्या होत्या. त्यावर्षी काँग्रेसचे एकूण १४९ उमेदवारी निवडून आले होते.