देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लाँच करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, या घोषणेवरून चव्हाण यांनी पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला.

आणखी वाचा- करोना लसीसाठी सरकारचा खटाटोप

“कोविड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा आयसीएमआरचा दावा अवास्तव आहे. लॉकडाउनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहीजे,” असं चव्हाण म्हणाले.

आणखी वाचा- “१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही”

आणखी वाचा- देशात पहिली करोना लस COVAXIN १५ ऑगस्ट रोजीच बाजारात येणार?

सोमवारी लस तयार केल्याची घोषणा

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm congress leader prithviraj chavan criticize pm narendra modi covaxin coronavirus red fort 15th august jud
First published on: 04-07-2020 at 13:56 IST