रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित पटेल हे २२ जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.
एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली. “रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे २२ जून २०२० पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली. एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण बनवण्यास योगदान देणं हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळते.
उर्जित पटेल यांचा राजीनामा
२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसंच रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. या बैठकीत मतभेद दूर करण्यावर चर्चा करण्यात येणार होती, असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
वाद मिटल्याच्याही चर्चा
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी हे या राजीनाम्याचे मुख्य कारण मानले जात होते. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात काही मुद्द्यांवर वाद सुरु होता. १९ नोव्हेंबरला एक बैठक पार पडली ज्यात आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी होते. या बैठकीनंतर उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातला वाद मिटला अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यांनंतरही त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु आता त्यांना एक नवी जबाबदारी मिळाली आहे.