देशात रेमडेसिवीर या करोनावर सध्या वापरात येणाऱ्या इंजक्शनचा तुटवडा असताना सुरत भाजप शाखेने शनिवारी येथे या औषधाच्या १००० कुप्यांचे मोफत वाटप केले.

नवीन सरकारी रुग्णालय व एसएमआयएमइआर रुग्णालयात या इंजेक्शनचा साठा नसल्याचे जाहीर करण्यात आले असताना भाजपने या औषधाचे वाटप केले. मोफत रेमडेसिवीर वाटपामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या असून हे औषध तयार करणारे कारखाने गुजरातेत आहेत. भाजपच्या सूत्रांनी सांगितले, की आम्ही पाच हजार इंजेक्शनची मागणी नोंदवली होती व गरजू लोकांना मदत करण्याचा त्यात हेतू होता.

मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सांगितले, की सरकारने हे औषध सुरत भाजप शाखेला दिलेले नाही. तुम्ही या इंजेक्शनचे व्यवस्थापन करणाऱ्या सीआर पटेल  यांना विचारा. पण कदाचित त्यांना सुरतच्या जनतेची काळजी वाटल्याने असे केले असावे. उधना येथील भाजप कार्यालयाबाहेर रेमडेसिवीर घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीने हे औषध दिले जात होते. पण भाजपने ‘परिशिष्ट एच’ मधील औषध त्यांच्या पक्ष कार्यालय आवारात कसे वाटले यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. लोकांनी जरी चिठ्ठ्या आणल्या असल्या तरी असे वर्तन करणे चुकीचे आहे. त्यांचे औषध दुकानदारांशी मैत्रीचे संबंध  असावेत, असे पटेल यांनी यावर सांगितले.