X
X

उन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार

READ IN APP

पिडित तरुणीच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

 

उन्नाव  येथे सामूहिक बलात्कारानंतर पाच आरोपींनी जाळून मारलेल्या २३ वर्षीय तरुणीच्या पार्थिवावर रविवारी कडकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पिडित तरुणीच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी स्थानिक रहिवासी व अधिकारी उपस्थित होते. सर्व थरातील लोकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. या वेळी समाजवादी पक्षाचे नेते तसेच उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य व कमल राणी वरुण उपस्थित होते. मौर्य यांनी सांगितले,की सरकार तरुणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. कमलराणी वरूण यांनी सांगितले,की  ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ घोषणेला अर्थ आहे, आम्ही त्या तरुणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा केली जाईल.

समाजवादी पक्षाचे आमदार सुनील सिंग साजन यांनी राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर चिंता व्यक्त केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था  ढासळली असून आज मुलींना असुरक्षित वाटत आहे. त्यांचे एफआयआर नोंदवून घेतले जात नाहीत. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याआधी तरुणीच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिला होता, पण लखनौचे विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांना अंत्यसंस्कारास राजी केले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी येथे येऊन आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन द्यावे, अशी मागणी तिच्या बहिणीने केली होती. मेश्राम यांनी सांगितले, की तरुणीच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येईल तसेच कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर दिले जाईल.

तरुणीच्या बहिणीने अशी मागणी केली होती, की कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी  द्यावी तसेच आरोपींना ताबडतोब फाशी देण्यात यावे. मात्र, जिल्हा दंडाधिकारी देवेंद्र पांडे यांनी सांगितले, की तरुणीच्या कुटुंबीयांनी सरकारी नोकरीची मागणी केलेली नाही.

पीडितेच्या वडिलांना २५ लाखांचा धनादेश

लखनौ : उन्नाव येथे सामूहिक बलात्कारानंतर जाळून मारण्यात आलेल्या तरुणीच्या वडिलांना २५ लाखांच्या सानुग्रह भरपाईचा धनादेश उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रदान केला. मौर्य यांनी त्यांच्या सहकारी कमला रानी वरूण यांच्यासमवेत उन्नाव मधील या मुलीच्या गावास भेट दिली. त्या वेळी त्यांनी तिच्या  वडिलांना धनादेश दिला. या कुटुंबास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देण्यात येईल असेही मंत्र्यांनी जाहीर केले. या कुटुंबास जी काही मदत लागेल ती देण्यास तयार असल्याचे मंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले,  की सरकारचा हेतू कुणावरही अन्याय  होऊ  नये  हा आहे.

21
X