नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा येडियुरप्पांचा दावा

बंगळुरू : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आयोजित करण्यात आलेल्या सभेत गुरुवारी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या एका तरुण महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिची कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, या महिलेचे यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध होते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

या महिलेचे नाव अमूल्या लिओना असे असून तिला ‘सेव्ह कॉन्स्टिटय़ूशन’ सभेच्या आयोजकांनी गुरुवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत भाषणासाठी निमंत्रित केले होते, तेव्हा तिने पाकिस्तान समर्थनाच्या तीनदा घोषणा दिल्या. त्यानंतर तिला व्यासपीठावरून हुसकावून लावण्यात आले आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तिला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता तिची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आपल्या कन्येने अक्षम्य चूक केली असल्याने कारवाई करावी, असे लिओनाच्या वडिलांनी म्हटले आहे.

शाळेविरुद्धच्या खटल्यास न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली : सीएएविरोधी आणि एनआरसीविरोधी नाटिका सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला.  त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बिदरमधील शाहीन शाळेचे मुख्याध्यापक आणि अन्य कर्मचारी यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यां योगीता भायाना यांनी याचिका दाखल केली आहे.

आणखी एक महिला ताब्यात

बंगळुरू : काश्मीर मुक्ती, दलित मुक्ती आणि मुस्लीम मुक्ती असा मजकूर लिहिलेले फलक फडकावल्याबद्दल एका तरुण महिलेला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या महिलेच्या विरोधात हिंदू जागरण वेदिकेने आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या या महिलेच्या हातामध्ये वरील घोषणा लिहिलेले फलक होते. वेदिकेच्या सदस्यांनी तिला तेथून जाण्यास सांगितले आणि गर्दी जमा होऊ लागल्याने तिला तेथून बाहेर काढण्यात आले, असे शहर पोलीस प्रमुख भास्कर राव यांनी सांगितले.

मत लादणे हा दहशतवादच- आरिफ मोहम्मद खान

नवी दिल्ली : सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत करून आपले मत इतरांवर लादणे हे दहशतवादाचे एक रूप आहे, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शुक्रवारी येथे शाहीन बाग निदर्शकांच्या संदर्भात व्यक्त केले.

‘आक्रमकता केवळ हिंसाचाराच्या रूपातून येते असे नाही,  तर ती अनेक रूपांमधून येते. जर तुम्ही माझे ऐकले नाही तर मी सर्वसामान्य जीवन विस्कळीत करेन हीसुद्धा आक्रमकताच ठरते,’ असे खान यांनी येथे आयोजित केलेल्या ‘भारतीय छात्र संसदे’त सांगितले.

मतभेद हे लोकशाहीचे सार आहे, परंतु पाच जण विज्ञान भवनाबाहेर बसतात आणि आम्हाला जे हवे आहे ते न झाल्यास येथून हलणार नाही असा इशारा देतात हे दहशतवादाचे आणखी एक रूप आहे, असे राज्यपाल म्हणाले.

भारत किंमत मोजत आहे -गिरिराज सिंह

पाटणा : फाळणीच्या वेळी मुस्लिमांना पाकिस्तानात पाठविण्यात आले नाही आणि हिंदूंना भारतात आणण्यात आले नाही त्याची किंमत भारताला मोजावी लागत आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.