मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु असतानाच सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने धक्का दिला. काँग्रेसचे दोन आमदार भाजपाच्या गळाला लागले असून दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला. ते दोघेही लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जाते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादूपिंडाच्या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसने गोव्यात भाजपाला हादरा देण्याची तयारी सुरु केली होती. भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला. मात्र, दुसरीकडे भाजपानेच काँग्रेसवर मात करत मोठा हादरा दिला.  काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर या दोघांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

सुभाष शिरोडकर यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आज भाजपात प्रवेश करत असून आगामी काळात काँग्रेसचे आणखी २- ३ आमदार भाजपात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही आमदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा सोमवारी रात्री केला होता. दोन्ही आमदार संपर्कात असून त्यांनी पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन दिल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मात्र, मंगळवारी गोव्यातील राजकारणात उलथापालथ झाली आणि हे दोन्ही आमदार भाजपात सामील झाले. यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

गोवा विधानसभेत ४० जागा असून यात भाजपाचे १४ आमदार आहेत. मगोप व जीएफपीचे प्रत्येकी ३ आमदार आहेत. याशिवाय ३ अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे १६ आमदारांचे संख्याबळ असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. दोन आमदारांनी साथ सोडल्याने काँग्रेसचे संख्याबळ १४ वर पोहोचले आहे.