गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी मिशन २०२२ साठी तयारी सुरू कसल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पार्टी देखील गोवा विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उद्या(मंगळवार) गोव्यात दाखल होत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केजरीवाल यांचा हा दौरा असणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, केजरीवाल यांनी आज गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत एक ट्विट देखील केलं आहे.

““गोव्याला बदल हवा आहे. आमदरांना विकत घेणारे व विकणारे पुरेसे पक्ष आहेत. बरच घाणेरडं राजकारण झालं आहे. गोव्याला विकास हवा आहे. निधीची काही कमतरता नाही, केवळ प्रामाणिक हेतूची कमतरता आहे. गोव्याला प्रामाणिक राजकारण हवे आहे. उद्या गोव्यात भेटूया.” असं आम आदमी पार्टीचे प्रमुख व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे.

केजरीवालांचं ‘मिशन पंजाब’! ३०० युनिट वीज मोफत देण्यासह केली मोठी घोषणा

याचबरोबर पुढच्या वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी देखील आम आदमी पार्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या चंदीगढ भेटीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पंजाबमध्ये ‘आप’ची सत्ता आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. तसंच पूर्वीचं सर्व वीजबिल माफ केलं जाईल, अशी घोषणा केलेली आहे.