बुलेट ट्रेनसाठी विक्रोळीमधली अत्यंत मोक्याची जागा अधिग्रहित करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात गोदरेज समूहानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आहे. या बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गामध्ये गोदरेज कन्स्ट्रक्शनची सुमारे ८.६ एकर जागा जात असून संबंधित संस्थांनी प्रकल्पाची रुपरेषा बदलावी असे आदेश कोर्टाने द्यावेत अशी याचिका गोदरेज समूहानं केली आहे.

मुंबई अहमदाबाद हे ५०८ किलोमीटरचे अंतर असून २१ किलोमीटर अंतर भुयारी असेल व बाकी सगळं अंतर जमिनीवरून कापण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचा प्रवेशाचा मार्ग विक्रोळी येथे आहे. गोदरेज समूहाने हा प्रस्तावित मार्ग बदलावा अशी मागमी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर ३१ जुलै रोजी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.

बुलेट ट्रेनला महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांचाही विरोध होत आहे. या प्रकल्पासाठी होत असलेल्या जमिन अधिग्रहणाविरोधात चार शेतकऱ्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांच्या उपस्थितीत पार पडला होता.

ताशी ३५० किलोमीटर गतीने धावणारी ही भारतातली पहिली प्रस्तावित बुलेट ट्रेन आहे. सध्या मुंबई अहमदाबाद अंतर कापायला सात तास लागतात हे अंतर तीन तासांवर येणार आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके असून ४ महाराष्ट्रात आहेत तर ८ गुजरातमध्ये आहेत.