अमेरिकेत फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांसारख्या इंटरनेट सेवा डाऊन झाल्या होत्या. जवळपास गेल्या दशकभरात पहिल्यांदाच अमेरिकेत गुगलच्या सेवा डाऊन झाल्या. एकाचवेळी अनेक युजर्सकडून इंटरनेटचा वापर होत असल्याने हा ब्लॅकआऊट झाल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेसह, युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्येही ही समस्या समोर आली आहे. मात्र, भारतासह अन्य कोणत्याही आशियाई देशात ही समस्या उद्भवलेली नाही. जवळपास चार तासांनंतर सेवा सुरळीत झाल्याचं समजतंय.

theverge च्या वृत्तानुसार गुगल डाऊन झाल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर, ‘पूर्व अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नेटवर्कच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम गुगल क्लाउड, स्नॅपचॅट, जीमेल, जी सूट आणि युट्यूब यांसारख्या सेवांवर झाला. सेवा वापरताना अॅपचा वेग अत्यंत मंदावणे किंवा अचानक एरर येणे अशाप्रकारच्या तक्रारी युजर्सकडून येत आहेत. यावर तोडगा शोधण्यात आला असून लवकरच सेवा सुरळीत होईल’ असं गुगलकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर जवळपास चार तासांनंतर ही समस्या सोडवत गुगलने, ‘पूर्व अमेरिकेतील नेटवर्कची समस्या सोडवण्यात आली आहे. पुन्हा ही अडचण होऊ नये यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येत आहेत. सेवा बंद असल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही ग्राहकांची माफी मागतो’, असं म्हणत माफी मागितली.