यावर्षी मार्च महिन्यात दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या परदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनवण्यात आलं तसंच करोना व्हायरसच्या प्रसाराला ते जबाबदार आहेत, असा आरोप करण्यात आला, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटलं आहे.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या २९ परदेशी नागरिकांविरुद्धचे एफआयआर रद्द करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवले. २९ परदेशी नागरिकांविरुद्ध साथ रोग आजार कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि पर्यटक व्हिसा अटींचे उल्लंघन अशा आयपीसीच्या विविध कलमांतंर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

दिल्लीत मरकजसाठी आलेल्या परदेशी नागरिकांविरोधात मोठया प्रमाणावर प्रचार करण्यात आला असे खंडपीठाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. “तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाविरोधात जो प्रचार करण्यात आला ते अयोग्य आहे. ५० वर्षाहून अधिक काळ हा कार्यक्रम सुरु आहे” असे कोर्टाने म्हटले आहे.

“देशात वेगाने पसरत असलेल्या संक्रमणाच्या आकड्यांवर नजर टाकली तर या लोकांविरोधात कारवाई करायला नको होती असे लक्षात येते. परदेशी नागरिकांविरोधात चुकीची कारवाई करण्यात आली. ते नुकसान भरुन काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे” असे कोर्टाने म्हटले आहे.