दिल्लीत चर्चवर करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या घटनांबाबत कोणतेही भाष्य न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडले आणि अल्पसंख्याक समुदायाच्या मनांत निर्माण झालेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक समुदायाला द्वेष आणि तेढ पसरविण्याची परवानगी देणार नाही. प्रत्येकाचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी घेईल आणि धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई करील, असे मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
कुरियाकोस आणि मदर युफ्रेसिया या दोन ख्रिस्ती धर्मोपदेशाकांना व्हॅटिकन सिटीने संतपद बहाल केल्याबद्दल सायरो-मलबार चर्चने दिल्लीत विज्ञान भवनात एका समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी मोदी बोलत होते. सरकार सर्व धर्माना समान सन्मान देते, आपले सरकार सर्वाना प्रत्येकाच्या धर्माचे योग्य अनुसरण करण्याची संधी देईल, कोणावरही कोणत्याही प्रकारीच बळजबरी केली जाणार नाही.
प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, अल्पसंख्य अथवा बहुसंख्य समाजातील कोणत्याही समूहाला एकमेकांविरुद्ध द्वेष पसरवू दिला जाणार नाही, तसे झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. केवळ मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी अल्पसंख्याक अशा प्रकारची चर्चा करीत आहेत, असेही समर्थकांचे म्हणणे आहे.
*सरकार सर्व धर्माना समान सन्मान देते, आपले सरकार सर्वाना प्रत्येकाच्या धर्माचे योग्य अनुसरण करण्याची संधी देईल, कोणावरही बळजबरी केली जाणार नाही.
*  कोणत्याही समूहाविरूद्ध द्वेष पसरवू दिला जाणार नाही, तसे झाल्यास कठोर कारवाई होईल.