महाविद्यालयाने नि:शुल्क वसतीगृहाची सुविधा देण्यास नकार दिल्यामुळे हँडबॉलच्या एका राष्ट्रीय महिला खेळाडूने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुजा (वय २०) असे खेळाडूचे नाव असून ती पटियाला येथील खालसा महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्गात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी पुजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून चिठ्ठी लिहिली असून त्यात गरीब मुलांना नि:शूल्क शिक्षण देण्याची मागणी तिने केली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
जाचे वडील भाजी विक्रेते असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुजा शिकत असलेल्या खालसा महाविद्यालयाने मोफत वसतीगृहाची सुविधा देण्यास नकार दिला होता. पुजाने आत्महत्येपूर्वी पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, मी गरीब असल्यामुळे वसतीगृहाचे पैसे भरू शकत नाही. माझ्यासारख्या गरीब विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा सरकारने मोफत द्यावी. माझ्या मृत्यूस महाविद्यालयाचे प्रोफेसर जबाबदार असल्याचा उल्लेख तिने चिठ्ठीत केला आहे. त्यांनीच तिला वसतीगृहातील खोली देण्यास नकार दिला होता. त्यासाठी तिला महिन्याला ३७२० रूपये खर्च करावे लागले असते. परंतु तिच्या वडिलांची इतकी ऐपत नसल्याचे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. चिठ्ठी रक्ताने लिहिल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान मोदी मला मदत करा, असे आवाहन तिने चिठ्ठीत केले आहे.
पुजाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र पुजाला १८ ऑगस्ट रोजीच मोफत प्रवेश दिल्याचे सांगितले आहे.