जद(यू)च्या चार बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा बिहार विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय मंगळवारी पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने पक्षाला चांगलाच दणका बसला आहे.राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी मतदान केल्याचा ठपका या चार आमदारांवर ठेवण्यात आला होता आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्तारूढ पक्षाने केली होती.ग्यानेंद्रसिंह ग्यानू, नीरजकुमार बबलू, राहुल शर्मा आणि रवींद्र राय अशी या चार बंडखोर आमदारांची नावे असून त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी १ नोव्हेंबर रोजी अपात्र ठरविले होते. मात्र, पक्षांतर आणि बंडखोरी हे समानार्थी नाही, असा निर्वाळा न्या. जे. पी. शरण यांनी दिला आणि विधानसभेच्या अध्यक्षांचा आदेश रद्दबातल ठरविला. या निर्णयाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे जद(यू)ने ठरविले आहे.