देशात आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेल्या १२.७६ कोटी लोकांपैकी ९० टक्के लोकांना कोव्हिशिल्ड ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली लस देण्यात आली आहे. ही लस मूळ ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून तिची निर्मिती तेथे ब्रिटिश-स्वीडिश अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने केली आहे.

१५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात केवळ कोव्हिशिल्ड लसच देण्यात आली. भारतात दुसरी लस हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने तयार केली असून ती कोव्हॅक्सिन नावाने प्रचलित आहे, पण अजून तरी या लशीचा पुरेसा वापर सुरू झालेला नाही. १२ कोटी ७६ लाख ५ हजार ८७० जणांना लस देण्यात आली असून त्यात ११ कोटी ६० लाख ६५ हजार १०७ जणांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली आहे. तर १ कोटी १५ लाख ४० हजार ७६३ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात कोव्हिशिल्ड लस देण्यात आली असून त्यात गोवा, चंडीगड, जम्मू काश्मीर यांचा समावेश आहे. कोव्हिशिल्ड लस खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली होती, त्यामुळे त्याची उपलब्धता जास्त असल्याने लसीकरणात कोव्हिशिल्डचे प्रमाण अधिक आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोगविभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले,की कोव्हॅक्सिनचे उत्पादनही लवकरच वाढवण्यात येणार आहे. भारत बायाटेकने मंगळवारी म्हटले आहे,की कोव्हॅक्सिन निर्मितीची क्षमता वाढवण्यात येणार असून हैदराबाद व बंगळुरू येथे वर्षाला ७० कोटी मात्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.