मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या वर्षभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया चांगलाच विस्तारल्याचे दिसून येत आहे. मार्च २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत संघाच्या तब्बल ५००० नवीन शाखा स्थापन झाल्याचे काल दिल्लीत झालेल्या संघाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासूनची ही सर्वात मोठी वाढ असल्याचा दावाही संघाच्यावतीने यावेळी करण्यात आला. यावेळी संघाच्या अलोक कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षभरात देशभरातील ३,६४४ नव्या ठिकाणी संघाच्या ५५२७ शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघटनेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेण्यात येतो. यानुसार, २०१२ सालापासून संघाची वाढ स्थिर होती. मात्र, यंदाच्या वर्षात झालेली वाढ ही संघटनेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासातील अभूतपूर्व वाढ असल्याचे अलोक कुमार यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात देशभरातील ५,१६१ ठिकाणी संघाच्या १०,१४३ नव्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला असला तरी वर्षभराच्या काळात येथील संघ शाखांची संख्या १,७८० वरून १,८९८ वर गेल्याचे कुमार यांनी सांगितले.